Sunday, October 06, 2024 03:15:47 AM

नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर

नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर

नवी मुंबई, २४ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पुन्हा अनिश्चित कालावधीपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासाठी एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चार वेळा तारखा जाहीर करून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाला पंतप्रधान कार्यालयाकडून तारीख पे तारीख दिली जात असल्यामुळे राज्य शासनासह सिडको आणि जिल्हाधिकारी रायगड कार्यालयातील अधिकारी हवालदिल झाले आहेत.

मागील बारा वर्षांपासून नवी मुंबईकर हे मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत. १ मे २०११ रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. तेव्हापासून या मेट्रोचा तिढा काही केल्या सुटत नाही. परंतु सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. १ वरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली होती. त्यामुळे आता लवकरच बेलापूर ते पेंधर या संपूर्ण मार्ग क्र. 1 वर प्रवासी वाहतूक सुरू होणार अशी नवी मुंबईकरांना अपेक्षा होती. मात्र आता याच मार्गिकेचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन पुढे ढकलण्यात आले आहे.

कोणत्या स्थानकांचा समावेश?
नवी मुंबईच्या या मेट्रो १ मार्गिकेमध्ये ११ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सीबीडी-बेलापूर, सेक्टर ७, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर ११, खारघर, सेक्टर १४, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर ३४, पाचनंद आणि पेंधर-तळोजा अशी स्थानके आहेत. यामुळे नवी मुंबईकरांच्या प्रवासाची चिंता आता मिटणार असल्याचं सांगण्यात येतय. मेट्रोची ही मार्गिका संपूर्ण नवी मुंबईच्या अंतर्गत भागातून जाते. त्यामुळे या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे.


सम्बन्धित सामग्री