Saturday, September 28, 2024 03:49:33 PM

राऊतांचा भाऊ अडचणीत

राऊतांचा भाऊ अडचणीत

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: मुंबई महापालिकेच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणात खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राजाराम राऊत अडचणीत सापडले आहेत. खिचडी घोटाळा प्रकरण संदर्भात संदीप राऊतांची चौकशी होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने संदीप राऊत यांना नोटीस देऊन शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. खिचडी घोटाळा प्रकरणातील पैसे संदीप राऊत यांनासुद्धा मिळायचे असा आरोप करण्यात आला आहे.

संदीप राऊत हे उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांचे धाकटे बंधू आहेत. त्यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खिचडी घोटाळा प्रकरणात या अगोदर उद्धव गटातील अमोल कीर्तिकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांचीसुद्धा चौकशी झाली होती.

खिचडी घोटाळा प्रकरण नेमका आहे तरी काय?

मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा १०० कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरीब मायग्रेन कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या मायग्रेन कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट ५२ कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या ४ महिन्यात ४ कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे.


सम्बन्धित सामग्री