Tuesday, July 02, 2024 08:59:21 AM

महाजनांच्या मतदारसंघातच मराठा आंदोलन पेटले

महाजनांच्या मतदारसंघातच मराठा आंदोलन पेटले

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी :  जालना येथील मराठा उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराचे प्रकरण चिघळले आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. मात्र दुसरीकडे त्यांच्याच मतदारसंघात मराठा समाजाच्या आंदोलनाने जोर धरला आहे. सोमवारी याबाबत दोन तास ठिय्या आंदोलन झाल्याने तो चर्चेचा विषय आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात सकल मराठा समाजातर्फे काल दोन तास ठिय्या आंदोलन झाले. त्यात राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यांसह अंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर पोलिस लाठीमाराच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी पालिकेसमोरील दोन तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. कोणत्याही स्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला.

सरकारने आंदोलन दडपून एकप्रकारे मराठा समाजावर अन्याय केला आहे, हेच सर्वांनी सांगितले. राजमाता जिजाऊ चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राजकारण आणू नका, असे मत भाजप तालुकाध्यक्ष चंदू बावस्कर यांनी करताच आंदोलक संतप्त झाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रदीप गायके, संजय गरुड, एस. टी. पाटील, शंकर मराठे, ज्ञानेश्वर बोरसे, वंदना चौधरी, राहुल चव्हाण, अश्पाक पटेल, प्रफुल्ल लोढा, अनिल बोहरा, राजू खरे, ईश्वर पाटील, किशोर पाटील, शंकर राजपूत, डॉ. प्रशांत पाटील, विकास पाटील आदींनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.


सम्बन्धित सामग्री