Thursday, July 04, 2024 08:45:20 AM

rahul-gandhi-shocking-claims-showing-foreign-newspapers
विदेशी वृत्तपत्रे दाखवत राहुल गांधींचे धक्कादायक दावे

विदेशी वृत्तपत्रे दाखवत राहुल गांधींचे धक्कादायक दावे

मुंबई, ३१ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : मोदी विरोधकांच्या बैठकीसाठी मुंबईत आलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी विदेशी वृत्तपत्रे दाखवत राहुल गांधी यांनी धक्कादायक दावे केले तसेच काही गंभीर आरोप केले. उद्योगपती अदानी यांच्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून चौकशी करावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधी यांनी राफेल करारावरून गंभीर आरोप केले होते. आता राहुल गांधी यांनी अदानींच्या मुद्यावरून आरोप केले आहेत.

भारतात जी २० परिषद होत आहे. ही चांगली बाब आहे. पण याआधी अदानी यांच्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत स्पष्टीकरण मिळणे आवश्यक असल्याचे राहुल गांधी म्हणाले. अदानी वापरत असलेला पैसा नेमका कोणाचा आहे, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. अदानींसाठी त्यांचे भाऊ विनोद अदानी तसेच नासिर अली शाबान अहली आणि चांग चुंग लिंग नावाचा चिनी नागरिक हे आर्थिक व्यवहार हाताळतात, असे राहुल गांधी म्हणाले. अदानींकडे अनेक बंदरांच्या आणि विमानतळांच्या विकासाची कंत्राटे आहेत. देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे काम महत्त्वाचे आहे. एवढे महत्त्वाचे काम करणाऱ्याच्या कंपनीचे व्यवहार हाताळणारा चिनी नागरिक कसा, असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी यांनी अदानींच्या संदर्भात धक्कादायक दावे करताना निवडक विदेशी वृत्तपत्रांच्या बातम्या आणि लेख प्रसारमाध्यमांना दाखवले. विदेशी वृत्तपत्रांतील वृत्त दाखवत राहुल गांधी यांनी अदानींच्या कंपन्यांच्या व्यवहारांची संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी केली.

राहुल गांधींचे प्रमुख आरोप
'एक अब्ज डॉलर भारताबाहेर कसे आणि का गेले?'
हा पैसा कुणाचा आणि कशासाठी फिरवला ?
पैशांच्या व्यवहारात चिनी व्यक्ती कशी ?


सम्बन्धित सामग्री