Thursday, July 04, 2024 11:15:14 AM

assembly-politics
सभांचं राजकारण

सभांचं राजकारण

मुंबई, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांनी आपापली ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी आज सर्व पक्षांनी मराठवाड्याची निवड केली आहे. मराठवाड्यात आज राजकीय पक्षांच्या सभांचा धुराळा उडणार आहे. यात हिंगोलीत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे बाँम्ब फोडणार आहेत. परभणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे धमाका करणार तर बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तरसभा घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचं लक्ष या प्रमुख सभांकडे लागले आहे. हिंगोलीतील रामलीला मैदानावर आज दुपारी उद्धव ठाकरे यांची तोफ विरोधकांवर धडाडणार आहे. विदर्भ दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या हिंगोलीत एंट्री करणार आहेत. या सभेची तयारी पूर्ण झाली असून या माध्यमातून ठाकरे गट मोठे शक्तीप्रदर्शनही करणार आहे. या सभेचा टीझरही ठाकरे गटाने शेअर केला आहे. ही सभा 'तेच तेज, तेच सळसळतं रक्त, तोच स्वाभिमान आणि तोच निष्ठावंतांचा जनसागर', या वाक्यांसह या टीझर व्हिडीओची सुरुवात होते. हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला मोठ्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहन प्रोमोच्या माध्यमातून ठाकरे गटाकडून करण्यात आले आहे. विदर्भ दौरा संपवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या हिंगोलीतून येणार आहेत. गेल्या आठ दिवसापासून सभेची तयारी सुरु असून शिवसेनेच्या सर्व स्थानिक नेतेमंडळींनी कसून या सभेची तयारी केली आहे. सर्वच ज्येष्ठ नेते कामाला लागले आहेत. हिंगोलीतील खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे यांचा हात सोडून एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. त्यामुळे या दोघांचा कुठल्या शब्दांत समाचार घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. उद्धव ठाकरे हिंगोलीत पक्षाच्या स्थानिक पक्षाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांची बाजू ऐकून घेऊन आगामी काळात पक्षाची रणनीती ठरवणार आहेत.


सम्बन्धित सामग्री