Thursday, July 04, 2024 11:28:15 AM

good-news-for-ganesha-devotees-in-mumbai
मुंबईतील गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी

मुंबईतील गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी

मुंबई, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी :  महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आगामी गणेशोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. मुंबईतील असंख्य गणेश मंडळांनी मंडप आणि ध्वानिक्षेपकाच्या परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. परंतु आता त्यापूर्वी मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत गणेशभक्तांना आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईत गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर सलग तीन दिवस रात्री उशीरा म्हणजेच १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकरला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी एका दिवसाची परवानगी कमी करण्यात आल्याने समन्वय समितीने यावर नाराजी व्यक्त केली आहे. गणेशोत्सवाचा दुसरा, पाचवा दिवस आणि अनंत चतुर्दशी असे तीन दिवसांत रात्री उशीरापर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देण्याचा निर्णय मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी गौरी गणपतीचं विसर्जन होणार आहे. त्यानंतर मुंबईसह पुण्यातील गणपतींच्या विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला जाणार आहे. परंतु पुणे शहरात गणेश मंडळांना पाच दिवस रात्री उशीरापर्यंत ध्वानिक्षेपकाची परवानगी देण्यात आली आहे. परंतु मुंबईत मात्र तीनच दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं आता ध्वानिक्षेपकासाठी आणखी दोन दिवसांची परवानगी वाढवून देण्याची मागणी गणेश मंडळांकडून करण्यात आली आहे. त्यामुळं आता ऐन गणेशोत्सवाच्या काळात राज्य सरकार आणि गणेश मंडळांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणासाठी काही ठराविक दिवसांसाठी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करता येतो. त्यासाठी बंदिस्त जागेची अट लागू होत नाही. परंतु परवानगीचे सर्व अधिकार संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले असतात. त्यामुळंच आता मुंबईत गणेश मंडळांना लाउडस्पीकरसाठी तीन दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळं आता पुण्यातील गणेशभक्तांना आनंद देणारी तर मुंबईतील गणेशभक्तांना दिलासा देणारी बातमी समोर आल्याने यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री