Thursday, July 04, 2024 10:45:15 AM

ajit-pawar-on-pimpri-chinchwad-tour-today
अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर

अजित पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर

 मुंबई, २५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी  : राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यातील सत्तेत सामील होऊन पुन्हा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार हे त्यांच्या आवडत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर शुक्रवारी येत असून पावणेदोन महिन्यांनंतर त्यांचा हा दौरा आहे. नव्या राजकीय समीकरणानंतर ते यावेळी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना काय नवा आदेश देतात, याकडे लक्ष लागले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमासाठी ६ ऑगस्टला ते उद्योगनगरीत तेवढ्यापुरते आले होते. ती त्यांची धावती भेट होती. शहराचा खास दौरा नव्हता. उद्याची अधिकृत पहिली शहर भेट असल्याने त्यांच्या स्वागताची राष्ट्रवादीने जोरदार तयारी केली आहे. मुंबईहून बाय रोड येणाऱ्या अजितदादांचे सकाळी नऊ वाजता शहरात प्रवेश करताना मुकाई चौक, रावेत येथे स्वागत केले जाणार आहे. त्यानंतर ते पिंपरी-चिंचवड महापालिकेत जाऊन आढावा बैठक घेतील. पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्या कारभारावर शहरातील राष्ट्रवादी नाराज असून ती त्यांनी अजित पवारांपर्यंत यापूर्वीच पोचवली आहे. त्यामुळे पिंपरी येथील बैठकीत ते पालिका प्रशासनाला आपल्या पद्धतीने समजावून सांगतील, अशी चर्चा आहे. २०१७ पर्यंत पिंपरी पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. २०१७ ला भाजप प्रथमच तेथे सत्तेत आली. दरम्यान, आतापर्यंत विरोधक असलेले हे दोन्ही पक्ष राज्यात एकत्र सत्तेत आले आहेत. त्यातून ते पिंपरी महापालिकेची आगामी निव़डणूक एकत्र लढणार आहेत. त्यासाठी ते आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काय नवा आदेश चिंचवडच्या मेळाव्यात देतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. हा मेळावा प्रा.रामकृष्ण मोरे सभागृहात होणार असून याच ठिकाणी अमित शाहांचा सहा ऑगस्टचा कार्यक्रम झाला होता.


सम्बन्धित सामग्री