मुंबई : महापालिकेने २९ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ३० मे रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत (१६ तास) जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी भागात काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवठा होणार आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करून वापर करावा, असे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.'के पूर्व' विभागात अंधेरी (पूर्व) येथील 'बी. डी. सावंत मार्ग व कार्डिनल ग्रेसिअस मार्ग जंक्शन ते कार्डिनल ग्रेसिअस मार्ग व सहार मार्ग जंक्शन येथे प्रत्येकी १५०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी आणि नवीन १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी (पार्ले आऊटलेट) या दोन मुख्य जलवाहिन्या जोडण्याचे व जुनी नादुरुस्त १२०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी काढून टाकण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम १६ तास सुरू राहील.हे काम पूर्ण झाल्यानंतर वेरावली जलाशय १, २, ३ ची पाण्याची पातळी सुधारेल व त्यामुळे अंधेरी (पूर्व) व (पश्चिम), जोगेश्वरी (पूर्व) व (पश्चिम), विलेपार्ले (पूर्व) व (पश्चिम) या भागांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कायमस्वरूपी सुधारणा होणार आहे, असे पालिकेने सांगितले.