मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० आणि गुरुवार २१ नोव्हेंबर रोजी महामुंबई मेट्रो अतिरिक्त फेऱ्या करणार आहे. निवडणूक कर्मचारी आणि मतदार यांच्या सोयीसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. एरवी कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत महामुंबई मेट्रोची सेवा पहाटे ५.२२ वाजता सुरू होते आणि रात्री ११ पर्यंत सुरू असते. या उलट बुधवार २० नोव्हेंबर २०२४ रोजी महामुंबई मेट्रो पहाटे ४ वाजता सुरू होईल आणि गुरुवार २१ नोव्हेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. पहाटे ४ ते ५.२२ तसेच रात्री ११ ते मध्यरात्री १ या वेळेत दर २० मिनिटांनी एक मेट्रो उपलब्ध असेल. महामुंबई मेट्रोच्या नियोजनानुसार बुधवार २० नोव्हेंबर रोजी पहिली मेट्रो पहाटे ४ वाजता गुंदवली, दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) स्थानकांवरून सुटेल. तर शेवटची मेट्रो गुरुवार २१ नोव्हेंबर, २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजता सुटेल. या सेवेबाबतची अधिक माहिती महामुंबई मेट्रोच्या सर्व स्थानकांवर उपलब्ध होईल.