Thursday, September 19, 2024 07:22:40 AM

ganpati visarjan
लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला मुंबई पुण्यासह नाशिक सज्ज

आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यायचा दिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे.

लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला मुंबई पुण्यासह नाशिक सज्ज

मुंबई : आपल्या लाडक्या गणरायाला निरोप द्यायचा दिवस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. लाडक्या बाप्पाला भाविक साश्रूपूर्ण नयनांनी निरोप देणार आहे. विसर्जनासाठी मुंबई पुण्यासह राज्यात सर्वत्र चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

मुंबईत दहा हजार सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन होणार आहे. यासाठी ९ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४० पोलीस उपाायुक्त आणि एकूण ५६ एसीपी कार्यरत असणार असल्याची माहिती मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह पोलीस आयुक्त यांनी दिली. मुंबईत २४०० पोलीस अधिकारी, २० हजार ५०० पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. आठ हजार सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेऱ्याने विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवलं जाणार आहे. गणरायाला निरोप देण्यासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. मुंबईत विसर्जनासाठी २०४ कृत्रिम तलाव उपलब्ध केले आहेत. तसेच भाविकांसाठी  १२ हजार अधिकारी - कर्मचारी कार्यरत असणार आहेत. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर आपल्या घराजवळील कृत्रिम तलावांची माहिती आपल्याला मिळेल. 

पुण्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात सहा हजार ५०० पोलिसांचा बंदोबस्त असेल. विसर्जनावर लक्ष ठेवण्यासाठी २०६ अधिकचे कॅमेरे आणि आरसीपी वज्र, क्यूआरटी यांनाही तैनात केले आहे. तसेच  विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांनी १३ ठिकाणी मोटारी आणि दुचाकी लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.

नाशिकमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस अधिकाऱ्यांसह तब्बल नऊशे पोलीस कर्मचारी आणि विशेष सीमा सुरक्षा दलाचा बंदोबस्त असेल. गणपती विसर्जनासाठी शहरातील वाहतूक मार्गात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेत. शहरातून जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री