Saturday, February 15, 2025 12:34:44 AM

Cidco Lottery News
नवी मुंबईत सिडकोच्या 26 हजार घरांसाठी शनिवारी निघणार लॉटरी वाचा सविस्तर बातमी

नवी मुंबई परिसरात सिडकोने 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेअंतर्गत 26 हजार घरांची सोडत काढण्याची तयारी केली आहे. ही सोडत येत्या 15 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता संगणकीय पद्धतीने काढली जाणार आहे

नवी मुंबईत सिडकोच्या 26 हजार घरांसाठी शनिवारी निघणार लॉटरी वाचा सविस्तर बातमी 

नवी मुंबई परिसरात सिडकोने 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या योजनेअंतर्गत 26 हजार घरांची सोडत काढण्याची तयारी केली आहे. ही सोडत येत्या 15 फेब्रुवारीला तळोजा नोडमध्ये सकाळी 11 वाजता संगणकीय पद्धतीने काढली जाणार आहे. या सोडतीचे थेट प्रक्षेपण सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर करण्यात येणार असून, अर्जदारांना घरबसल्या निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत सिडकोने तळोजा नोडमध्ये सर्वाधिक घरे बांधली आहेत. ही घरे स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जात असली तरी अद्याप काही घरे विक्रीविना शिल्लक आहेत. विशेष म्हणजे, 2018 ते 2022 या कालावधीत विविध योजनांच्या माध्यमातून तळोजा नोडमध्ये जवळपास पाच हजार घरे बांधण्यात आली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने ही घरे अद्याप विक्रीविना पडून आहेत. सध्या सुरू असलेल्या गृहयोजनेतील 26 हजार घरांपैकी जवळपास पन्नास टक्के घरे तळोजा नोडमध्येच आहेत.

प्रकल्पस्थळी सोडत काढण्याचा निर्णय
सिडकोने खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, कळंबोली, बामणडोंगरी, खारकोप आणि मानसरोवर या भागांत 26 हजार घरांच्या विक्रीची योजना जाहीर केली होती. या योजनांसाठी तब्बल दीड लाख अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 21,399 अर्जदारांनी बुकिंगची रक्कम भरण्यात यश मिळवले आहे. पात्र अर्जांची अंतिम यादीही सिडकोकडून जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सोडतीसाठी प्रकल्पस्थळाची निवड करण्यात आली आहे.

सिडकोच्या गृहप्रकल्पातील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी व्हावी, यासाठी ही सोडत तळोजा नोडमधील पाचनंद सेक्टर 28 मधील गृहप्रकल्पाच्या आवारात आयोजित करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना प्रकल्पाच्या सुविधांची माहिती मिळेल तसेच अधिकाधिक लोक योजनेत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विक्रीविना शिल्लक असलेल्या घरांची विक्री होऊन सिडकोची आर्थिक कोंडी दूर होईल, अशी आशा या उपक्रमातून व्यक्त करण्यात येत आहे.

सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर या सोडतीचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने अर्जदारांना घरबसल्या निकाल पाहता येणार आहे. तळोजा नोडमधील गृहयोजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.