मुंबई : मोबाईल फ्रेंडली नव्या पिढीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. 'मतदानाच्या ठिकाणी मतदारांना मोबाईल सोबत नेण्यास बंदी घालणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या १४ जून २०२३ रोजीच्या आदेशात काही गैर दिसत नाही आणि आयोगाचा तो निर्णय बेकायदाही वाटत नाही', असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी याविषयीची जनहित याचिका फेटाळून लावली. यामुळे मतदान करताना सेल्फी काढता येणार नाही. मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार नाही.
बुधवारी मतदारांना मतदान केंद्रावर सोबत मोबाईल नेता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने नेमलेले पर्यवेक्षक आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकृत अधिकारी व पोलिस अधिकारी हे वगळता अन्य कोणालाही मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या परिघात मोबाईलचा वापर करता येणार नाही, असे आयोगाने १४ जून २०२३ रोजीच्या अनेक निर्देशांपैकी एका निर्देशात स्पष्ट केले. मात्र, 'आयोगाचा तो आदेश घटनाबाह्य, बेकायदा व नागरिकांच्या मूलभूत हक्कांना बाधा आणणारा आहे', असे म्हणत मुंबईतील वकील उजाला यादव यांनी जनहित याचिका केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयाने आयोगाचा निर्णय कायम ठेवला.