नवी मुंबई : मुंबई आणि उपनगरात धोकादायक इमारती पडून त्यात निष्पापांचा जीव जाण्याच्या घटना वारंवार घडतात. दरवर्षी या घटनांत वाढ होत असते. मात्र, या घटनांना पूर्णविराम मिळत नाही. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातदेखील शेकडो धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने या इमारती धोकादायक, अतिधोकादायक घोषित करूनही जवळपास २७४ कुटुंबे अशा इमारतींत वास्तव्य करून आहेत. यामुळे पावसाळ्यात दुर्दैवाने दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने या इमारतींची वर्गवारी केली आहे. या वर्गवारीत धोकादायक आणि अतिधोकादायक असे दोन भाग केले असून, सर्वाधिक अतिधोकादायक आणि धोकादायक इमारती पनवेल आणि कळंबोली शहरांत आहेत. या ६३ अतिधोकादायक इमारतींमध्ये २७४ कुटुंबे वास्तव्यास आहेत. पनवेल शहरात जीर्ण व धोकादायक इमारती कित्येक वर्षांपासून आहेत. नगर परिषदेच्या काळापासून त्या उभ्या आहेत.