Wednesday, April 16, 2025 09:42:57 PM

पुढील ३६ तास समुद्रात जाणे टाळा, हवामान विभागाचा इशारा

 पुढील ३६ तास समुद्रात जाणे टाळा हवामान विभागाचा इशारा

मुंबई, ५ मे २०२४, प्रतिनिधी: भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हिस यांच्याद्वारे प्राप्त माहितीनुसार, शनिवार दिनांक ४ मे २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून ते रविवार दिनांक ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत ३६ तासांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली आहे. हा इशारा लक्षात घेता, समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी, येत्या ३६ तासाच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे. तसेच मच्छिमार बांधवांनी योग्य दक्षता घ्यावी. सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

तसेच, किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना या कालावधीत किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून उसळणाऱ्या लाटांमुळे एकमेकांना धडकून बोटींचे नुकसान होणार नाही, समुद्रात मच्छिमारी करताना खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री