Friday, July 05, 2024 04:11:35 AM

मुंबईत २४ एप्रिलपर्यंत पाच टक्के पाणीकपात

मुंबईत २४ एप्रिलपर्यंत पाच टक्के पाणीकपात

मुंबई, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात विविध कामे सुरू असल्याने एप्रिल महिन्याच्या २४ तारखेपर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून पालिकेच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. आशिया खंडातील हे सर्वांत मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. भांडुप संकुल येथे १ हजार ९१० दशलक्ष लिटर आणि ९०० दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट्स आहेत. त्यापैकी ९०० दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रतिदिन ९९० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते.

या जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया टाक्या स्वच्छ करण्याची पावसाळ्यापूर्वीची मोहीम सध्या हाती घेण्यात आली आहे. यामुळे २४ एप्रिलपर्यंत पालिकेकडून संपूर्ण मुंबई क्षेत्रासाठी होणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यात ५ टक्के पाणीकपात केली आहे.


सम्बन्धित सामग्री