Friday, July 05, 2024 02:30:44 AM

मुंबईतील कर्नाक पुलाचे काम प्रगतीपथावर

मुंबईतील कर्नाक पुलाचे काम प्रगतीपथावर

मुंबई, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशिद बंदर स्थानकादरम्यान तीन ओव्हरहेड वायर स्थलांतर करण्याचे काम मध्य रेल्वे करणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यात मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक मिळणार नसल्याने कर्नाक बंदर पुलावर ५०० टन वजनाचे गर्डर बसविण्यास आता एप्रिल महिना उजाडणार आहे. त्यामुळे हा पूल ऑगस्ट अखेरपर्यंत सेवेत येण्याची शक्यता आहे, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

मशिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डिमेलो मार्गाला जोडणारा १५४ वर्षें जुन्या कर्नाक पुलाचा पालिकेकडून पुनर्विकास सुरू आहे. दक्षिण मुंबईतील मशिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मोहम्मद अली रोड परिसरातील व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. सन २०१८मध्ये आयआयटीने केलेल्या सुरक्षा ऑडिटनंतर हा पूल धोकादायक जाहीर करून पुनर्बांधणी करण्याची शिफारस करण्यात आली. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी हा पूल पाडण्यात आला. त्यानंतर पालिकेच्या पूल विभागाकडून पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मे २०२४ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. यासाठी सुमारे ५२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या पुलाच्या खाली असणारी अतिक्रमणे तसेच व्यावसायिक गाळे या कामात अडथळे ठरत होती.

एकूण १२ अतिक्रमणे हटवण्याचे आव्हान प्रशासनापुढे होते. यातील बहुतांशी बांधकामे हटवल्यामुळे पुलाच्या कामाला वेग आला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते मशिद बंदर स्थानकाच्या पूर्व भागातील टाटा पॉवर कंपनीच्या दिशेला पुलाचा पाया उभारण्यात येत आहे. त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर पश्चिम दिशेला उताराचे काम सुरू आहे. तीन ओव्हरहेड वायर स्थलांतर करण्याचे काम मध्य रेल्वे करणार आहे. त्यामुळे पुलावर गर्डर लाँच करण्याचे काम एप्रिल अखेरपर्यंत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


सम्बन्धित सामग्री