Saturday, July 06, 2024 11:18:37 PM

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारा सागरी किनारा सेतू होणार सुरू

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारा सागरी किनारा सेतू होणार सुरू

पहिल्या टप्प्याची वैशिष्ट्ये

मुंबई, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबईकरांसाठी एक खुशखबर असून मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होऊन सुखद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (दक्षिण) ची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होणार आहे. ज्यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

दक्षिण मुंबईतील परिसर व्यापार उदिमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. सात बेटांनी तयार झालेल्या मुंबईचा भौगोलिक विस्तार उत्तर दक्षिण असा पसरलेला असल्याने येथील देशाच्या मुख्य भागाशी जोडलेले दोन मुख्य रस्ते देखील उत्तर दक्षिण असेच बांधलेले होते. साहजिकच या रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब असे. तथापि मागील काही वर्षांत या रस्त्यांना पूरक असे नवीन रस्ते तयार होत असल्याने रहदारीची ही जटील समस्या कमी होऊ लागली आहे.
नुकत्याच सुरू झालेल्या ‘अटल सेतू’ नंतर आता सोमवारी वाहतुकीसाठी खुला होत असलेला मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

पहिला टप्पा सुमारे साडेदहा किलोमीटर असून प्रवासी वाहतुकीसाठी मंगळवार, १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजल्यापासून किनारा मार्ग खुला होईल. सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७० टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये ३४ टक्के बचत होईल. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. सुमारे ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल.

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) ची सध्या वरळी ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका खुली होणार असून या रस्त्याची लांबी १०.५८ कि.मी. असून मार्गिकांची रस्त्यावरील संख्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार असेल. तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी ४.३५ कि.मी. असून पुलांची एकूण लांबी २.१९८ कि.मी.आहे. सध्या सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते रात्री ८ असा सागरी किनारा मार्ग खुला असेल. बोगद्यात प्रवेश करताना ताशी ४० किमी, बोगद्यात प्रवेश केल्यानंतर ताशी ६० किमी तर खुल्या मार्गावर ताशी ८० किमी इतकी वेगमर्यादा आहे. दुचाकी, तीनचाकी वाहनांना बंदी असेल. तसेच अवजड मालवाहतुकीच्या गाड्यांना देखील बंदी असेल. सोबतच बेस्ट बस आणि खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस वाहतूक शक्य असेल.


सम्बन्धित सामग्री