Friday, July 05, 2024 02:29:44 AM

शीव उड्डाणपुल पुढील दोन वर्षांसाठी बंद !

शीव उड्डाणपुल पुढील दोन वर्षांसाठी बंद

प्रतिनिधी, मुंबई, दि. २५ फेब्रुवारी २०२४ : धोकादायक असणारा शीव रेल्वे उड्डाणपूल बंद करण्यासाठी नव्या तारखेची घोषणा झाली आहे. (दि. २९ फेब्रुवारी) गुरुवारपासून पूल दोन वर्षे वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे शीव रुग्णालयाजवळ वाहतूककोंडीची दात शक्यता आहे.

रेल्वे आणि आयआयटी तज्ज्ञांच्या अहवालात शीव रेल्वे उड्डाणपूल पाडून नव्याने उभारण्याची शिफारस करण्यात आली. त्यानुसार २० जानेवारीपासून पूल बंद करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र, खासदार राहुल शेवाळे यांनी स्थानिकांची मते विचारात घेतली नसल्याचे सांगत रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक बंद करण्यास विरोध केला होता. अखेर पुलाच्या पाडकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुलावरील वाहतूक बंद करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मध्य रेल्वेला ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. पूर्व द्रुतगती मार्ग आणि धारावी, ९० फुटी रोड यांना जोडणारा महत्त्वाचा पूल अशी शीव रेल्वे उड्डाणपुलाची ओळख आहे. यामुळे पूल बंद झाल्यानंतर पर्यायी मार्ग असलेल्या शीव रुग्णालयातील चौकावर मोठी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. पूल पाडण्यासाठी सहा महिने आणि पूल उभारण्यासाठी १८ महिने अशा २४ महिन्यांत पूलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुलावरील विविध केबल्स हटवण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात पुलावरील स्लॅब, डांबरी रोड काढण्यात येणार आहे. अखेरच्या टप्प्यात विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेऊन पुलाचे गर्डर काढून टाकण्यात येणार आहेत.


सम्बन्धित सामग्री