Sunday, July 07, 2024 09:05:31 PM

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे मोदी करणार उद्घाटन

कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे मोदी करणार उद्घाटन

मुंबई, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड अर्थात मुंबई सागरी महामार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यात वरळी ते मरिन लाईन्स हा दहा किलोमीटरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केले जाईल. प्रकल्पाचे काम १५ मे पर्यंत पूर्ण होणार आहे. पण त्या काळात लोकसभेच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरून प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन १९ फेब्रुवारी रोजी करण्याचा निर्णय झाला आहे.

कोस्टल रोड अर्थात मुंबई सागरी महामार्ग प्रकल्पाचे दोन टप्पे आहेत. यातील पहिला टप्पा हा मरिन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपुलापासून वरळी - वांद्रे सागरी सेतूपर्यंत आहे. दुसरा टप्पा हा कांदिवली जवळ मुंबईच्या पश्चिम उपनगरापर्यंत आहे. कोस्टल रोडचा पहिला टप्पा १०. ५८ किमी. तर दुसरा टप्पा हा २९ किमी. चा आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचा एकूण खर्च बारा हजार ७२१ कोटी रुपये एवढा आहे. या प्रकल्पात १६.६६ किमी. चे तीन इंटरचेंज आणि २.०७ किमी. लांबीचे दोन बोगदे आहेत. या रस्त्यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरातून थेट दक्षिण मुंबईत रस्ते मार्गाने जाणे सोपे होणार आहे. प्रवास वेगवान होईल. वेळ आणि इंधनाची बचत होईल. कोस्टल रोडमुळे वेळेची ७० टक्के बचत होणार आहे.


सम्बन्धित सामग्री