Sunday, July 07, 2024 12:32:19 AM

'मिशन ४५ प्लस'साठी महायुतीचा एल्गार

मिशन ४५ प्लससाठी महायुतीचा एल्गार

मुंबई, ०३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी: मुंबईत महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे सहभागी होते. यावेळी सुनील तटकरे म्हणाले की, गेल्या १० वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशानं नवी उंची गाठली. महायुतीचे एकत्रित मेळावे जानेवारीपासूनच सुरू होत आहेत. १४ जानेवारीला राज्यातील सर्व जिल्ह्यात महायुतीचे मेळावे एकाचवेळी सुरू होतील. मोठ्या संख्येने कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहतील. याआधी वरळी इथं महायुतीचा मेळावा झाला होता. आता जिल्हा पातळीवर मित्रपक्षात व्यापक संपर्क व्हावा. ६ प्रादेशिक विभागात जिल्हा मेळावे घेणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावे फेब्रुवारीपासून सुरू होतील अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अनेक चांगले निर्णय देशपातळीवर झाले. राज्यातही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या नेतृत्वात जे काही चांगले निर्णय झालेत ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवणे, शासन आपल्या दारी या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना योजना पोहचवल्या आहेत. आता गावपातळीवरील घटक पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोमलिन, संवाद घडवणे त्यातून आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत संघटितपणे मार्गक्रमण करण्यात येणार आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन पुढील रणनीती तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं.

१४ जानेवारीपासून राज्यातील ३६ जिल्ह्यात जिल्हास्तरीय महायुतीचे मेळावे घेण्यात येतील. त्यानंतर तालुकास्तरीय मेळावे होतील. जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्यापासून बूथपर्यंत आणि फेब्रुवारीत विभागीय मेळावे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांच्या नेतृत्वात होतील. रामदास आठवले, विनय कोरे, महादेव जानकार, जोगेंद्र कवाडे, सदाभाऊ खोत हे घटक पक्षाचे नेतेही मेळाव्याला हजर राहतील. मोदींच्या नेतृत्वात महायुतीला प्रचंड मोठे यश महाराष्ट्रात मिळेल. महाराष्ट्रात ४५ हून अधिक जागा आम्ही जिंकणार आहोत. आम्ही तिन्ही पक्षांनी तशी तयारी केली आहे. तिन्ही पक्षाचे नेते आपापल्या पक्षाला मजबूत करण्याची योजना आखली आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री