Sunday, June 30, 2024 09:59:09 AM

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टर संपावर

जेजे रुग्णालयातील डॉक्टर संपावर

मुंबई, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : जे. जे रुग्णालयातील २१ डॉक्टर गेल्या नऊ दिवसांपासून सामूहिक रजेवर आहेत. विभागप्रमुख डॉ. महेंद्र कुरा यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून डॉक्टरांनी हा पवित्रा घेतला आहे. परंतु, अजून देखील डॉ. कुरा यांना पदावरून हटविले गेलेले नाही. या संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी रुग्णालयातील सर्व ९०० निवासी डॉक्टरांनी गुरुवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

निवासी डॉक्टर संपावर जाणार असले तरी अतितत्काळ विभागात मात्र ते सेवा देणार आहेत. ओपीडी आणि वॉर्डमधील रुग्ण मात्र ते पाहणार नाहीत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि त्वचाविकार विभागातील संपकरी डॉक्टर यांच्यात मंगळवारी बैठक झाली. मात्र, त्यात कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलनाला सर्व निवासी डॉक्टरांनी पाठिंबा दर्शविला आहे.

विविध आरोप असलेल्या डॉ. कुरा यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. त्यात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले आणि ससून वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचा समावेश आहे. या प्रकरणी आठडाभरापूर्वी चौकशी समितीने त्यांचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना सादर केला आहे. त्यानंतर शासनाने डॉ. कुरा यांना सक्तीच्या रजेवर पाठविले.


सम्बन्धित सामग्री