Sunday, July 07, 2024 12:28:58 AM

धुक्यातही रेल्वे धावणार सुसाट!

धुक्यातही रेल्वे धावणार सुसाट

मुंबई, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : हिवाळ्यात दाट धुक्यामुळे मार्गावरचे काहीच दिसत नाही. त्याचा परिणाम वाहतूक सेवेवर होतो. अशा स्थितीत मध्य रेल्वेने नावीन्यपूर्ण धुके सुरक्षा यंत्र फॉग सेफ्टी डिव्हाईस (एफएसडी) विकसित केले आहे. याचा फायदा रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी होणार आहे.

हिवाळ्यात दाट धुक्यामुळे रेल्वेची सिग्नल दृश्यमानता कमी झाल्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर परिमाण होतो. अपघाताची शक्यता बळावून प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे चालकांना मदत करण्याच्या उद्देशाने हे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. हे यंत्र धुके जीपीएस तंत्रज्ञानावर चालते. चालकांना आगामी तीन सिग्नल्सबाबत ऑडिओ आणि व्हिज्युअल संकेतांद्वारे सूचना देते. वास्तविक स्थानाच्या ५०० मीटर आधी सिग्नलची दिशा जाहीर करून रेल्वे चालकांना त्यांच्या गाड्या सुरक्षितपणे हाताळण्यासाठी अधिक सतर्क राहण्यास मदत करते.

तसेच धुक्यामुळे रेल्वेचा वेग सामान्यतः ३०-६० किमी प्रतितास असतो. फॉग सेफ्टी डिव्हाईस (एफएसडी)मुळे ७५ किमी प्रतितास वेग मिळतो. त्यामुळे रेल्वेचा खोळंबा करणारा कालावधी कमी होतो. प्रतिकूल हवामानातही रेल्वे परिचालनाची सुरक्षितता आणि कार्यक्षता वाढविते.

या विभागातील गाड्यांमध्ये यंत्रणा
नागपूर- २२० उपकरणे, मुंबई- १०, भुसावळ- २४८, सोलापूर-९ आणि पुणे विभागात १० उपकरणे बसविण्यात आली आहेत.


सम्बन्धित सामग्री