Wednesday, July 03, 2024 04:29:57 AM

मुंबईचे आकाश झाकोळले

मुंबईचे आकाश झाकोळले

मुंबई, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : मुंबईत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण आहे. वातावरणातील प्रदूषकांना आर्द्रतेची जोड मिळाल्याने मुंबईभर धुरक्याचे साम्राज्य होते. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून सफर या हवामान प्रदूषण मापन प्रणालीनुसार शुक्रवारी मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८८ होता; तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार हा निर्देशांक १८९ होता. 'मुंबईत सध्या प्रदूषणाची श्रेणी मध्यम आहे.

पश्चिमी प्रकोपामुळे वातावरण ढगाळ झाले आहे. मुंबईत हलक्या प्रमाणात धुकेही आहे. पश्चिमी प्रकोपामुळे वाढलेली आर्द्रता यामुळे प्रदूषके हवेमध्ये साचून आहेत. प्रदूषकांचे प्रमाण कमी असले तरी आर्द्रतेमुळे प्रदूषके वातावरणात अडकल्याने मुंबईत धुरकट वातावरण दिसत होते', अशी माहिती 'सफर'चे प्रकल्प संचालक डॉ. सचिन घुगे यांनी दिली. शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुल येथे २६०, अंधेरी पूर्व येथे २७७ तर माझगाव येथे २७३ असा हवेचा गुणवत्ता निर्देशांक असण्याचा अंदाज आहे. पण मुंबईचा एकूण निर्देशांक शनिवारी १५९ नोंदवला जाईल, असे पूर्वानुमान 'सफर'ने वर्तवले आहे. पश्चिमी प्रकोप कमी होईल, तशी आर्द्रता कमी होईल आणि मुंबईतील ढगाळ आणि धुरकट वातावरणात घट होईल, असेही सांगण्यात आले आहे.


सम्बन्धित सामग्री