Thursday, November 21, 2024 04:15:24 PM

गारठ्याबरोबर प्रदूषणातही वाढ

गारठ्याबरोबर प्रदूषणातही वाढ

मुंबई, १९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबईमध्ये सोमवारी किमान तापमान रविवारपेक्षा चढे असले तरी हवेतील आर्द्रता आणि धुके यामुळे हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या हवेचा निर्देशांक सोमवारी मध्यम होता. मात्र वांद्रे कुर्ला संकुल येथे हवेची गुणवत्ता वाईट नोंदली गेली. मंगळवारीही मुंबईतील काही केंद्रांवरील हवा वाईट असेल, असा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सफर या प्रणालीच्या माध्यमातून नोंदवण्यात आला आहे.

सफरच्या नोंदीनुसार सकाळच्या सुमारास मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक १९० हून पुढे पोहोचला होता. कुलाबा येथे सोमवारी किमान तापमान २४ तर सांताक्रूझ येथे २३.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दोन्ही केंद्रांवर रविवारपेक्षा अनुक्रमे १.६ आणि ३.४ अंशांनी किमान तापमान अधिक होते. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ३.३ आणि ५.६ अंशांनी अधिक होते. मुंबईच्या या दोन्ही केंद्रांवर किमान तापमान चढे असले तरी मुंबईच्या काही भागांमध्ये मात्र गारठा जाणवू आहे. तसेच मुंबईत धुक्याचेही अस्तित्व पुन्हा दिसू लागले आहे. धुक्यामुळे मुंबईच्या वातावरणामध्ये प्रदूषके साचून राहण्याचे प्रमाण येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यामध्ये मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार या तीन दिवसांमध्ये मुंबईकरांना धुके जाणवेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. याचा परिणाम मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo