Sunday, July 07, 2024 10:07:46 PM

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटांना धमकी

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटांना धमकी

मुंबई, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबई पोलिसांना टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांच्याबद्दल धमकीचा फोन आला, ज्यामध्ये कॉलरने दावा केला की, “रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा त्यांची अवस्था आणखी वाईट होईल, ते सायरस मिस्त्रीसारखे बनतील.” हा फोन आल्यानंतर मुंबई पोलीस पूर्ण अलर्ट मोडमध्ये आहेत. पोलिसांनी त्यांच्या एका टीमला त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचवेळी दुसऱ्या टीमला फोन करणाऱ्याची माहिती गोळा करण्यास सांगण्यात आले.

फोन करणारा ५ दिवसांपासून घरातून बेपत्ता होता

सूत्रांनी सांगितले की, कॉलरशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा फोन बंद होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक सहाय्य आणि टेलिकॉम कंपनीच्या मदतीने कॉलरचा शोध घेतला. फोन करणाऱ्याचे लोकेशन कर्नाटकातील असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा पत्ता शोधून काढला असता फोन करणारा हा पुण्याचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. हा फोन करणारा कॉलर गेल्या ५ दिवसांपासून बेपत्ता असून त्याच्या पत्नीनेही पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती, असा दावाही सूत्रांनी केला आहे.

स्किझोफ्रेनियाने ग्रस्त

फोन करणाऱ्याला स्किझोफ्रेनियाचा त्रास असून त्याने कोणालाही न सांगता घरातून फोन घेतल्याचेही चौकशीदरम्यान उघड झाले. त्याच फोनवरून त्याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल नंबरवर फोन करून रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की फोने करणारा अज्ञात इसम मानसिक आजारी आहे, त्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. त्यांनी फायनान्समध्ये एमबीए केले असून अभियांत्रिकीचेही शिक्षण घेतले आहे.


सम्बन्धित सामग्री