Friday, July 12, 2024 04:34:17 PM

मुंबईत थंडीची चाहूल

मुंबईत थंडीची चाहूल

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: गेल्या आठवड्याच्या अखेरीस पावसाळी वातावरणामुळे निर्माण झालेला किंचित गारवा, त्या आधीचा उकाडा यानंतर बुधवारी मुंबईत थंडीची चाहूल लागली. पहाटेच्या वातावरणामध्ये झालेल्या बदलाच्या जाणिवेसोबतच मुंबईकरांनी दुपारच्या वेळीही दिलासादायक वातावरण असल्याची भावना व्यक्त केली.

मुंबईमध्ये कुलाबा येथे बुधवारी २२.२ तर सांताक्रूझ येथे २१.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान नोव्हेंबर अखेरीच्या सरासरी किमान तापमानापेक्षा अधिक असले तरी मंगळवारपेक्षा कुलाबा येथील तापमान १.८ अंशांनी तर सांताक्रूझ येथील तापमान २.५ अंशांनी खाली उतरले होते. कुलाबा येथे बुधवारी ३०.२ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे २.८ आणि २.२ अंशांनी खाली उतरले होते. कमाल तापमानामध्ये मंगळवारपेक्षा फार मोठा बदल झाला नसला, तरी बुधवारी दुपारच्या वेळी जाणवणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईकरांना तापमान दिलासा मिळाला. अवघ्या दोन ते तीन दिवसांमध्ये वातावरणात झालेला बदल सध्या अनुभवाला येत आहे.

पश्चिमी प्रकोपामुळे उत्तरेमध्ये बर्फवृष्टी होत आहे. याचा परिणाम म्हणून राज्यात गारवा निर्माण झाला आहे. मुंबईमध्ये सातत्यपूर्ण थंडी पडत नाही. पश्चिमी प्रकोपामुळे उत्तरेकडून वारे येऊ लागले की मुंबईमध्ये टप्प्याटप्प्याने थंडी जाणवते. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये मुंबईच्या वातावरणात फार बदल होणार नाही, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे अधिकारी सुनील कांबळे यांनी दिली. मात्र, बुधवारी झालेला वातावरणबदल हा थंडीची चाहूल देणारा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. हा टप्पा संपला की पुन्हा एकदा तापमानात किंचित वाढही होऊ शकते.


सम्बन्धित सामग्री