Friday, July 05, 2024 02:18:52 AM

मालाडमधील ५० वर्षे जुनी चाळ अखेर तोडणार

मालाडमधील ५० वर्षे जुनी चाळ अखेर तोडणार

मालाड, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: मालाड पश्चिमेकडील आनंद रोड येथील ‘इस्माईल बिल्डिंग’ या ५० वर्षांहून अधिक जुन्या चाळीतील रहिवासी व व्यापाऱ्यांना मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयाकडून अद्यापही कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. त्यामुळे अतिधोकादायक (सी-१) म्हणून जाहीर झालेली ही इमारत तोडण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे या एक मजली इमारतीच्या जागी नव्याने होणाऱ्या इमारतीत मूळ चाळवासीयांचे भाडेकरू म्हणून असलेले हक्क कायम राहतील, अशी स्पष्टोक्तीही उच्च न्यायालयाने दिली असून त्यानुसार प्रत्येकाच्या गाळ्याचे मोजमाप करण्याचे निर्देशही महापालिकेला दिले आहेत.

महापालिकेने ११ नोव्हेंबर रोजी इमारत रिक्त करण्याबाबत कलम ३५४ अन्वये बजावलेल्या नोटीसला चाळवासीयांनी अॅड. धीरेन शाह यांच्यामार्फत याचिकेद्वारे आव्हान दिले होते. अत्यंत जुन्या असलेल्या या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत पालिकेने प्रथम २५ जानेवारी २०२३ रोजी चाळ मालक व गाळेधारकांना मुंबई महापालिका कायद्याच्या कलम ३५३-ब अन्वये नोटीस बजावली होती. त्यानुसार, एका दुकानदाराने स्ट्रक्चरल ऑडिट केले. मात्र, त्यात आवश्यक चाचण्या करण्यात आल्या नव्हत्या. म्हणून पालिकेने ११ ऑक्टोबरला पुन्हा नोटीस बजावून संधी दिली.

त्यानंतर गाळेधारकांनी एका संस्थेकडून ऑडिट करून घेतले. त्यात ‘ही इमारत अतिधोकादायक गटात नसून किरकोळ दुरुस्ती करण्याच्या सी-३ गटात आहे आणि त्यामुळे रिक्त करण्याची आवश्यकता नाही’, असा निष्कर्ष मांडण्यात आला. तर चाळमालकाने एका संस्थेकडून करून घेतलेल्या ऑडिटमध्ये ही इमारत सी-१ गटात असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला. हा अहवाल नियमाप्रमाणे आवश्यक चाचण्यांसह असल्याने पालिकेने हाच अहवाल ग्राह्य धरून ११ नोव्हेंबर रोजी कलम ३५४ अन्वये नोटीस बजावली. त्याला गाळेधारकांनी याचिकेद्वारे आव्हान दिले होते.

           

सम्बन्धित सामग्री