Friday, July 05, 2024 10:23:29 PM

वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल

वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह मुंबईतील हवा प्रदूषण सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहे. हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. त्यामुळे वायू प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मात्र, तरीही काहीजणांकडून या सूचनांची पायमल्ली केली जात आहे.

अशातच मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्यानं आणि शहरात वायू प्रदूषण निर्माण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत वायू प्रदूषणाप्रकरणी दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा आहे. महापालिकेने या बांधकाम व्यावसायिकाविरोधात तक्रार दिली होती.

मुंबईतील वाढते हवा प्रदूषण लक्षात घेता महापालिकेने कठोर पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या नियमांचे पालन करा, असं महापालिकेच्या वतीने वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, तरी देखील काही बांधकाम व्यावसायिक या नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसून येत आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एका बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीएमसीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी बिल्डरविरुद्ध नोंदवलेला हा पहिला एफआयआर आहे. बीएसमसीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, बिल्डर भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या बांधकाम साईटवर 25 फुट उंचीचा पत्रा लावलेला नाही.

त्यामुळे या व्यावसायिकाला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तरी देखील आरोपींनी बांधकामाच्या ठिकाणी 25 फूट उंचीचा पत्रा न टाकता पुन्हा बांधकाम सुरू केलं, ज्यामुळे लोकसेवकाच्या आदेशाचं उल्लंघन झालं. म्हणून भारत रियल्टी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सम्बन्धित सामग्री