Sunday, July 07, 2024 12:32:09 AM

बोरिवली-विरारदरम्यान दोन मार्गिकांचे काम हाती

बोरिवली-विरारदरम्यान दोन मार्गिकांचे काम हाती

मुंबई, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरवीसी) बोरिवली आणि विरार दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम एक डिसेंबरपासून हाती घेण्यात येणार आहे. कॉरिडॉरच्या प्रस्तावित मार्गावर असलेले अडथळे हटवणे, हे प्राथमिक काम असेल. आत्तापर्यंत, पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय भागात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि बोरिवली ते विरार या चार मार्गांचा समावेश आहे. मुंबई सेंट्रल ते बोरिवलीपर्यंत पाचवी, तर खार आणि गोरेगाव दरम्यान सहावी मार्गिका आहे.

सहावी मार्गिका २०२५ च्या अखेरीस बोरिवलीपर्यंत वाढवण्याची योजना आहे. मेल-एक्स्प्रेस आणि मुंबई सेंट्रल आणि विरार दरम्यान उपनगरी विभागातील रेल्वे वाहतूक प्रभावीपणे वेगळी करणे, हे लाइन विस्तार प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या कार्यक्षमतेला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. "मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) ३अ अंतर्गत कार्यान्वित होणाऱ्या या प्रकल्पासाठी दिलेले हे पहिले कंत्राट आहे" अशी माहिती एमआरवीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस सी गुप्ता यांनी दिली. बुकिंग ऑफिस, रिले रूम, टॉयलेट ब्लॉक्स आणि ऑफिसेससह एकूण ४७ रेल्वेसंबंधित वास्तू, अतिरिक्त ट्रॅकसाठी मार्ग तयार करण्यासाठी पाडल्या जाणार आहेत. तसेच फूट ओव्हर ब्रिजच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया १० डिसेंबरपासून सुरू होणार आहे.


सम्बन्धित सामग्री