Sunday, July 07, 2024 01:31:46 AM

वाशी, बेलापूरमध्ये नवे वाहनतळ

वाशी बेलापूरमध्ये नवे वाहनतळ

नवी मुंबई, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: वाशी, बेलापूर या दोन शहरांमध्ये होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने दोन्ही ठिकाणी वाहनतळ उभारण्यावर भर दिला आहे. सध्या महापालिकेने बेलापूर सेक्टर १५ येथे एक चार मजली पार्किंग इमारत उभारली आहे. आता बेलापूरमध्ये दुसरी आणि वाशी सेक्टर ३ येथे तिसरी वाहनतळ इमारत उभारण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. यापैकी बेलापूर येथील वाहनतळ येत्या महिनाभरात नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.

नवी मुंबईत दिवसेंदिवस वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यावर वाहनांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः बाजारपेठा असणाऱ्या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्यामुळे रस्त्याच्या कडेला मिळेल त्याठिकाणी वाहने उभी केली जातात. भर रस्त्याच्या कडेला वाहने उभी केल्यामुळे रस्ता अरुंद होऊन चालण्यास जागा उरत नाही. बेलापूर सेक्टर २, बेलापूर सेक्टर १५ आदी भागात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. वाशी सेक्टर ९, रेल्वे स्थानक परिसर हा भाग बाजारपेठांमुळे गजबजलेला असतो. वाशीतून कोपरखैरणेला जाण्यासाठी रस्ता असल्यामुळे या सेवा रस्त्यावरून वाहनांची संख्या अधिक असते. संध्याकाळच्या वेळेस या भागात वाहनांची संख्या वाढल्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाशी सेक्टर ३० येथील भूखंडावर महापालिकेतर्फे वाहनतळाची इमारत उभारण्यात येणार आहे. तसेच बेलापूर येथे दुसरी बहुमजली वाहनतळ उभारले जाणार आहे. वाशी आणि बेलापूरमध्ये वाहनतळासाठी सिडकोने दिलेल्या या भूखंडावर वाहन उभारण्यासाठी महापालिकेचा प्रस्ताव तयार आहे.

वाहनतळ कोण चालवणार

बेलापूर सेक्टर १५ येथे भूखंडावर महापालिकेने वाहनतळाची चार मजली इमारत उभारली आहे. ही इमारत पूर्णपणे तयार असून विद्युतविषयक कामे पूर्ण झाल्यावर लवकरच लोकार्पण होणार आहे. परंतु, ही इमारत महापालिकेने स्वतः तयार केली असून या इमारतीवर जाहिरात करून खर्च वसूल करण्याच्या नियमावर वाहनतळ चालवायला देण्याचे महापालिकेच्या विचाराधीन आहे. परंतु, महापालिकेचा प्रशासकीय कामांवरील वाढता खर्च पाहता दोन्ही इमारत खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्याच्या विचारात महापालिका आहे. त्यामुळे आर्थिक जोखमीची माहिती देणारा सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.

              

सम्बन्धित सामग्री