Tuesday, July 02, 2024 09:39:26 AM

सुट्ट्यांच्या अदलाबदलीमुळे गोंधळ, ईदनिमित्त शुक्रवारी शासकीय सुट्टी

सुट्ट्यांच्या अदलाबदलीमुळे गोंधळ ईदनिमित्त शुक्रवारी शासकीय सुट्टी

मुंबई, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी असल्याने मिरवणुकांचा ताण तसेच इतर कारणांमुळे राज्य शासनाने शुक्रवारी म्हणजे ईदची सुट्टी जाहीर केली. ऐनवेळी ईदची सुट्टी बदलल्यामुळे सगळीकडे गोंधळाचे वातावरण आहे. शासन आदेशानंतर बँकांनी गुरुवारी कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर सलग पाच दिवस सुट्ट्या द्याव्या लागणार असल्याने शाळा प्रशासनही संभ्रमात आहेत. यावर तोडगा म्हणून काही शाळांनी ऑनलाइन आणि शनिवारी शाळा सुरू ठेवण्याचा पर्याय निवडला आहे.

मुंबई गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी ठिकठिकाणी प्रचंड गर्दी उसळते. वाहतूक कोंडी आणि इतर प्रकार रोखण्यासाठी अनंत चतुर्दशीला शाळांना सुट्टी दिली जाते. बँका, कार्यालये यांना सुट्ट्या नसल्या तरी होणारी गर्दी पाहता कार्यालये लवकर सोडण्यात येतात. यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने शासकीय कार्यालये, शाळा-कॉलेज, बँका सर्वच बंद ठेवण्यात येणार होते. राज्य सरकारने ईदची सुट्टी गुरुवार ऐवजी शुक्रवारी देण्यात येईल असे जाहीर केले. त्यामुळे गुरुवारी सुट्टी असणार की नाही याबाबत सर्वांमध्ये संभ्रम होता.

मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात गणेश विसर्जनाची सुट्टी असते, यासबंधीचे स्थायी आदेश आहेत. ईदची सुट्टी गुरुवारी आल्याने ती बदलून शुक्रवारी करण्यात आली. म्हणजे मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यात सलग दोन दिवस शासकीय सुट्टी आहे. तर अन्य जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टी देण्याचे अधिकार असल्याने प्रत्येक जिल्ह्यासाठी तेथील जिल्हाधिकारी निर्णय घेतील. बहुतांश शाळा मात्र गुरुवारी अनंत चतुर्दशी, शुक्रवारी ईद, शनिवार आणि रविवार तसेच सोमवारी गांधी जयंती अशा सलग पाच दिवस बंद राहणार आहेत.


सम्बन्धित सामग्री