Sunday, July 07, 2024 03:07:56 AM

'हा द्वेषाच्या राजकारणाचा परिपाक'

हा द्वेषाच्या राजकारणाचा परिपाक

मुंबई, २८ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: मुलुंड येथे एका मराठी जोडप्याला एका सोसायटीत गुजराती सदस्यांनी जागा देण्याचं नाकारल्याचा धक्कादायक व्हीडिओ समोर आला. महाराष्ट्राच्या राजधानीत ही घटना घडणं दुर्दैवी आहे. पण हा द्वेषाच्या राजकारणाचा परिपाक आहे. धर्म, जात कमी पडते की काय, म्हणून आता भाषेच्या आधारावरही लोकांमध्ये भांडणं होऊ लागली आहेत, असं मत मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी नोंदवलं. हे सगळं सामाजिक एकात्मतेसाठी धोकादायक असून यापुढे द्वेषाचं नाही, तर प्रेमाचं राजकारण करण्याची गरज असल्याचं प्रतिपादनही आ. गायकवाड यांनी केलं. तसंच भविष्यात अशा घटना घडू नये, याची सर्वांनीच काळजी घ्यायची गरज बोलून दाखवत सामाजिक द्वेष पसरवणाऱ्या घटना घडल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मुलुंड पश्चिम भागात शिवसदन या गुजराती भाषिक बहुल सोसायटीत ऑफिस भाड्याने घेण्यासाठी एक मराठी जोडपं गेलं असता त्यांना 'महाराष्ट्रीय लोकांना जागा देणार नाही,' असं सांगून हुसकावण्यात आलं. या जोडप्यातील महिलेने या प्रकाराचा व्हीडिओ करत सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी या वादात उडी घेतली. मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारे पक्षही हिरहिरीने मैदानात आले आणि संबंधित गुजराती भाषिक व्यक्तींना त्यांनी माफीही मागायला लावली.

या सर्वच प्रकरणावर भाष्य करताना मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार वर्षा गायकवाड यांनी संयत भूमिका घेतली. धर्म, जात, वंश, रंग, भाषा अशा कोणत्याही आधारावर एकमेकांसोबत भेदभाव करणं ही गोष्टच दुर्दैवी आहे. पण सध्याचे सत्ताधारी धर्माधर्मांत, जातीपातीत आणि आता भाषिक आधारावरही राजकारण करत असून त्यामुळे समाजात दुही पसरली आहे. द्वेषाच्या राजकारणाचे परिणाम हे असे वाईटच होतात, असं आ. गायकवाड म्हणाल्या.

या द्वेषाचा नायनाट करून भारतभर प्रेमाचा आणि एकतेचा संदेश देण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रा काढली. या यात्रेदरम्यान भेदांच्या भिंती ओलांडून लोक एकत्र आले होते, असंही आ. गायकवाड म्हणाल्या. समाजात ही द्वेषाची आणि दुहीची बीजं पेरण्याऐवजी प्रेमाचा आणि आपण सगळे भारतीय एक आहोत, हा संदेश देणं महत्त्वाचं आहे. काँग्रेस पक्ष याच विचारधारेचं नेतृत्व करत पुढे चालला आहे. असंही त्यांनी स्पष्ट केलं.


सम्बन्धित सामग्री