Saturday, July 06, 2024 11:54:20 PM

एफडीएने उचललं कडक पाऊल

एफडीएने उचललं कडक पाऊल

मुंबई, २ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: 'एफडीए'कडून हॉटेलांमधील स्वच्छता, अन्नसुरक्षेच्या संदर्भातील धडक मोहीम सुरूच असून आणखी १२ हॉटेलांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमधील ही हॉटेले असून, त्यांना निकषांची पूर्तता करण्यासाठी निश्चित अवधी दिला आहे. या कालमर्यादेमध्ये निकषांची पूर्तता न झाल्यास त्यांचा परवाना कायमचा जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी यासंदर्भात अनेक हॉटेलांकडे परवाना नसल्याचे सांगितले. विनापरवाना हॉटेल चालवली जातात. त्यांना यासंदर्भातील निकष माहीत नसतात. काहीवेळा परवाना घेणे गरजेचे नाही, असाच त्यांचा समज असतो. काही हॉटेलांमध्ये स्वच्छता, सफाई तसेच अन्न शिजवण्यासाठी जे निकष दिले आहेत, त्यांचे पालन करण्यात आलेले नाही, असेही दिसून आल्याचे आढाव यांनी सांगितले. वांद्रे येथील हॉटेलमध्ये खाद्यपदार्थामध्ये मृत उंदीर आढळल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने शहर उपनगरातील हॉटेलांची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेमध्ये प्रशासनाचे १३ अन्न सुरक्षा अधिकारी मुंबईतील हॉटेलांमध्ये तपासणी करत आहेत.

आत्तापर्यंत सत्तरहून अधिक हॉटेलांवर कारवाई झाली असून, नियमांची पूर्तता न करणाऱ्या आणखी १२ हॉटेलांवर एफडीएकडून पुन्हा कारवाई करण्यात आली आहे. नियमांची पूर्तता होईपर्यंत या हॉटेलांना व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्न शिजवणे, त्याचे वितरण करणे तसेच त्याची विक्री करण्यासंदर्भातील कोणत्याही बाबीसाठी परवान्याची गरज असते. तरीही हा परवाना न घेता हॉटेलांकडून व्यवसाय चालवला जातो. त्याचा परिणाम अनेकदा गुणवत्तेवर होतो.

     

सम्बन्धित सामग्री