Sunday, October 06, 2024 08:43:17 PM

वर्षा निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना

वर्षा निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना

मुंबई, १९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : वर्षा निवासस्थानी बाप्पाची प्रतिष्ठापना गणेशोत्सवानिमित्त ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. जी सार्वजनिक गणेश मंडळे नियमानुसार गणेशोत्सव साजरा करतात, त्यांना सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी द्यावी, मंडपासाठी शुल्क आकारणी करु नये अशा सूचना प्रशासनाला दिल्यामुळे गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा

विद्या आणि कलांचा अधिपती असलेल्या गणरायाच्या आगमनानिमित्त राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. निर्बंधमुक्त उत्सव साजरा करत असताना समाजभान जपण्याचे व पर्यावरणाची हानी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेला गणेशोत्सव आता केवळ राज्यातच नव्हे तर देश-विदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आपण सर्वजण लाडक्या विघ्नहर्त्याची दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो. आपली संस्कृती, परंपरा व सामाजिक ऐक्य जपण्याचे कार्य या उत्सवाने केले आहे; असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गणेश मंडळांनी वर्षानुवर्षे स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत समाजप्रबोधनाचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक मनोरंजन, आरोग्य शिबीर आदी उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधीलकी जपली आहे. त्यामुळे राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. हा उत्सव साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, निर्माल्य ठरलेल्या ठिकाणीच एकत्रित केले जाईल, याची काळजी गणेश मंडळ व भाविकांनी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गणेशोत्सवाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा

पमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केले असून राज्यातील जनतेला श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या भक्तीमय शुभेच्छा दिल्या. श्रीगणरायांच्या आगमनासोबत घराघरात धनधान्याची समृध्दी येईल. समाजात आनंद, उत्साह, भक्ती, चैतन्याचं वातावरण निर्माण होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव निसर्गाची काळजी घेत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.


सम्बन्धित सामग्री