Tuesday, July 02, 2024 08:50:31 AM

मुंबईकरांचा शेवटच्या डबल डेकरला भावूक निरोप

मुंबईकरांचा शेवटच्या डबल डेकरला भावूक निरोप

मुंबई, १६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबईतील बेस्टची डबल डेकर बस स्थानकात आली की बरेच प्रवासी वरच्या मजल्यावरील आसन पकडण्यासाठी एकच धडपड करतात. डबल डेकरमधील वरील आसनावर बसून मुंबई पाहताना होणारा आनंद काही वेगळाच. मात्र शुक्रवारी शेवटच्या डबल डेकर बसचा हाच आनंद घेताना प्रवासी, बेस्टचे निवृत्त कर्मचारी भावूक झाले होते. अंधेरी पूर्व रेल्वे स्थानक ते सीप्झ मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक ४१५ च्या शेवटच्या डबल डेकरला ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्गाबरोबरच बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी अनेकांनी बेस्टच्या जुन्या आठवणींना उजळा दिला. अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील आगारात प्रवासी संघटनांनी चालक-वाहकांसोबत केक कापून बेस्टच्या शेवटच्या डबल डेकरला निरोप दिला.

बेस्ट उपक्रमाची शेवटची डबल डेकर बस शुक्रवारी अंधेरी स्थानक पूर्व रेल्वे स्थानक ते सीप्झ मार्गावर धावली. सायंकाळी ४ नंतर अंधेरी आगारातून सुटणाऱ्या डबल डेकर बस प्रवासासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. हार, फुग्यांनी बसला आतून आणि बाहेरून सजवले होते. बेस्टचे काही चालक-वाहक आपल्या लहान मुलांनाही बस दाखवण्यासाठी घेऊन आले होते. अंधेरी स्थानकाबाहेरून बस सुटल्यानंतर नटराज स्टुडिओ, चकाला मार्गे सीप्झपर्यंत जाताना काही बस थांब्यांवर प्रवाशांकडून बसची छबी मोबाइल कॅमेऱ्यात टिपली जात होती. तर, दुकानदार आणि पादचाऱ्यांनाही या बसचे शेवटचे दर्शन मोबाइलमध्ये कैद करण्याचा मोह आवरत नव्हता. खेळीमेळीच्या वातावरणात शेवटच्या डबल डेकरमधून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. व्हिडीओ शूटिंग, छायाचित्रे काढतानाच काही प्रवासी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या ही घोषणा अधूनमधून देत होते. उपस्थित ज्येष्ठ नागरिकही प्रवासादरम्यान जुन्या आठवणींना उजळा देताना भावूक झाले होते.


सम्बन्धित सामग्री