Saturday, October 05, 2024 03:17:44 PM

'बडे मियाँ रेस्टॉरंट'वर एफडीएचा छापा

बडे मियाँ रेस्टॉरंटवर एफडीएचा छापा

मुंबई, १४ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: मुंबईतील प्रसिद्ध फूड जॉईंट 'बडे मियाँ रेस्टोरंट'वर अन्न आणि औषध प्रशासनाने सायंकाळच्या सुमारास छापा मारला. मुंबईतील खाद्य प्रेमींच्या आवडीचे ठिकाण असलेल्या या ७६ वर्षे जुन्या फूड जॉइंटवर एफडीएची काही तास छापेमारी सुरू होती.

काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये जेवणात उंदीर आढळून आला होता. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाने मुंबईत मोहीम सुरू केली असून विविध हॉटेल्सची तपासणी केली जात आहे.

बडे मियाँवर छापेमारी केल्यानंतर हॉटेलमधील स्वच्छता आणि इतर कागदपत्रांची तपासणी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली.

एफडीएच्या पथकाने 'बडे मियाँ'च्या कुलाबा येथील आउटलेटला भेट दिली, त्यावेळी त्यांच्याकडे फूड लायसन्स नसल्याचे आढळून आले. त्यानंतर आम्ही काम थांबवण्याची नोटीस बजावली असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्याशिवाय, इतरही काही बाबी आढळल्या असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने दिली.

रेस्टोरंटच्या मालकांनी दावा फेटाळला

तर, दुसरीकडे 'बडे मियाँ रेस्टोरंट'चे मालक इफ्तिकार शेख यांनी एफडीए अधिकाऱ्यांचा दावा फेटाळून लावला आहे. आमच्याकडे व्यवसायासंबंधीचा परवाना असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले. सायंकाळच्या सुमारास अन्न आणि औषध प्रशासनाने काही अधिकाऱ्यांसह पथक आले होते. त्यांनी रेस्टोरंटची पाहणी केली आणि काही नमुने सोबत घेऊन गेले असल्याची माहिती इफ्तिकार शेख यांनी दिली.


सम्बन्धित सामग्री