Sunday, July 07, 2024 12:00:54 AM

जेल मध्ये जाण्यापूर्वी काय घडलं?

जेल मध्ये जाण्यापूर्वी काय घडलं

बीड, १७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बीड मध्ये सभा झाली. शरद पवार यांच्या भाषण आधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाषण केलं. अनिल देशमुख यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री असताना शंभर कोटी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी याबाबतचे आरोप केले होते. या आरोपांप्रकरणी अनिल देशमुख तब्बल १४ महिने जेलमध्ये होते. अखेर काही दिवसांपूर्वी त्यांची जेलमधून सुटका झाली. त्यानंतर आज बीडमध्ये जाहीर सभेत त्यांनी त्यावेळी घडलेल्या घडामोडींची आठवण सांगितली. “मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो. मला खोट्या प्रकरणात फसवण्यात आलं. केस कोर्टात गेल्यानंतर माझ्यावर मुंबईचे तत्कालीन आयुक्त परमबीर सिंहने शंभर कोटी घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनीच जस्टीस चांदिवालच्या कोर्टात सांगितलं की, अनिल देशमुखांवर मी जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत. मी ऐकलेल्या माहितीच्या आधारावर आरोप केले, असं त्यांनी कोर्टात सांगितलं. त्यावर हायकोर्टाने निर्णय दिला आणि मी तब्बल 14 महिन्यांनी जेलमधून बाहेर पडलो”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. “मी तुम्हाला सांगू इच्छितो १४ महिने मी आर्थर रोड जेलमध्ये होतो. एक चुकीच्या केसमध्ये, आरोप करुन मला फसवण्यात आलं होतं. मला तडजोड करण्याचा सल्ला देण्यात आलेला. मी तडजोड करण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला जेलमध्ये टाकण्यात आलं. मी १४ महिने जेलमध्ये होतो. पण शरद पवार यांच्या आशीर्वादाने बाहेर आलोय. १४ महिने जेलचा भत्ता खावून बाहेर आलोय. कुणी माय का लाल अनिल देशमुखला मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही”, असंही ते म्हणाले.


सम्बन्धित सामग्री