मुंबई : 1 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक वर्ष 2025-26 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरे बजेट असल्यामुळे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
गेल्या अर्थसंकल्पात शेती क्षेत्राला प्राधान्य दिले गेले होते. यंदा किसान सन्मान निधीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. मात्र, सरकार ही रक्कम 8,000 रुपये किंवा त्याहून अधिक करण्याचा विचार करत आहे. संसदेच्या कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया विषयक स्थायी समितीने ती वाढवून 12,000 रुपये करण्याची शिफारस केली आहे.
पिक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता:
याशिवाय, पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यावर सरकार भर देऊ शकते. कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या योजनेचे महत्त्व अधोरेखित केले होते. दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना युनिव्हर्सल क्रॉप इन्शुरन्स योजनेचा लाभ मिळावा यासाठी शिफारस केली आहे.
शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना आणि त्यांचा आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी मोदी सरकार यंदाच्या अर्थसंकल्पात ठोस पावले उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा या अर्थसंकल्पावर टिकून आहेत.