अमरावती : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्हा परिषदेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संचित मोहपात्रा यांनी हिरवा झेंडा दाखवला.

रॅलीत अमरावती जिल्ह्यातील 13 दिव्यांग शाळांमधील शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. मतिमंद, दृष्टीहीन आणि इतर दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या रॅलीची खासियत म्हणजे विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू आदी थोर महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. यामुळे रॅलीला एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आकर्षक देखावेही साकारण्यात आले होते. रॅलीतून दिव्यांग विद्यार्थ्यांनी समाजातील संवेदनशीलता वाढवण्याचा संदेश दिला. रॅलीचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींच्या कौशल्यांना वाव देणे आणि त्यांच्या अधिकारांबाबत समाजात जागृती निर्माण करणे हा होता.

