कोकण : कोकणातील पोपटी पार्टी ही एक अत्यंत खास परंपरा आहे जी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन साजरी केली आहे. हिवाळ्याच्या महिन्यांत शेतकरी शेतातील कामे पूर्ण करून रात्री जागे राहण्यासाठी आणि थंडीतून वाचण्यासाठी एकत्र येतात. शेतावर थंडीपासून वाचण्यासाठी आणि विरंगुळा म्हणून ही पार्टी केली जात असते. पोपटी पार्टी म्हणजे एकत्र येऊन, शेतातील भाज्या, फळे आणि मांसाहारी पदार्थ एकत्र करून भाकरी, शाकाहारी आणि मांसाहारी पोपटी शिजवणे.
पोपटी पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे ती रात्रभर केली जाते, यामध्ये शेतकऱ्यांची मोकळ्या जागेत बसून गप्पा मारणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे, गाणी गाणे आणि ठराविक पदार्थ तयार करणे यांचा आनंद घेतला जातो. गावातील लोक एकत्र येऊन शेतात किंवा मोकळ्या जागेवर एक शेकोटी पेटवून आणि त्यात पोपटी तयार करून आनंद घेतात.शेकल्या नंतर, गप्पांमध्ये रंगलेली असते, जिथे लोक एकमेकांशी गप्पा मारतात, गाणी गातात आणि जुन्या आठवणींना ताजेतवाने करतात. ही एक विशेष गंध आणि चवीची पार्टी आहे. त्यात शेतीचे साहित्य, शेतात उगवलेली भाज्यांची विविधता आणि मांसाहारी पदार्थांचा वापर करून पोपटी तयार केली जाते.

पोपटी बनवण्याची पद्धत:
पोपटीची तयारी शाकाहारी तसेच मांसाहारी दोन्ही प्रकारात केली जाऊ शकते. हिवाळ्यात शेतात पीकलेल्या वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, रताळी, वांगी, बटाटे इत्यादी भाज्यांचे थर मडक्यात तयार करतात. मडक्याच्या तळाशी भांबुर्डीच्या पाला ठेवला जातो आणि त्यावर भाज्यांचे थर रचले जातात.
मांसाहारी पोपटी बनवताना चिकनला मसाला लावून केळीच्या पानात बांधून ठेवले जाते. हे मडक्याचे तोंड पाल्याने झाकून उलटे ठेवले जाते आणि त्याच्या आजुबाजूला गोवऱ्या, गवत आणि लाकडे ठेवून शेकोटी पेटवली जाते. हे मटकं गरम शेकले जाते आणि अर्धा पाऊण तासात तयार होते. शिजल्यानंतर मडक्याचं तोंड काढून पोपटी सर्वांना एका मोठ्या परातीत काढून सर्वात शेवटी तिचा आस्वाद घेतला जातो.
ही पार्टी इतर पार्टीपेक्षा वेगळी आणि रोमांचक आहे, कारण यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात आणि अंधारात शेकोटीच्या प्रकाशात गरमागरम पोपटीचा आस्वाद घेणं वेगळंच.त्यात तुम्ही कुटुंबसोबत असा किंवा तुमच्या मित्र परिवारासोबत त्याचा आनंद कायम द्विगुणित होतोच. कारण त्यांच्यासोबतच्या गप्पा, गाणी, आणि मजेदार क्षणांनी भरलेल्या या पार्टीमध्ये निसर्ग आणि तुमचं संमेलन याला आताच्या मॉर्डेन भाषेत 'कॅम्प पद्धत' असंही म्हणता येईल, कारण एका उबदार स्थानावर शेकोटीत भाकरी व मसालेदार पदार्थ तयार करून विविध परिवार, मित्र आणि पाहुण्यांसोबत एकत्र असताना हा आनंद वाढतो.