मुंबई : मुलींना उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक अडचणी येऊ नये, यासाठी कमवा शिक योजनेंतर्गत विद्यार्थीनींना शैक्षणिक मदत व्हावी यासाठी ‘कमवा आणि शिका’ योजना अधिक प्रभावी करून त्यांना किमान दरमहा दोन हजार रुपये आर्थिक साहाय्य देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. योजनेतील या सुधारणामुळे विद्यार्थिनींसाठी मोठी शैक्षणिक मदत मिळेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे दिला जाणारा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार 2022-23 प्रदान सोहळा एसएनडीटी महिला विद्यापीठात उत्साहात झाला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते राज्यातील सहा महसूल विभागातील प्रत्येकी एका महिलेस या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ, अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा : Beed Crime Satish Bhosle: गुन्हेगारी विश्वातील ‘खोक्या भाई’ अटकेच्या छायेत – अटकपूर्व जामीनासाठी धडपड
मंत्री पाटील म्हणाले की, कोरोनामुळे काही वर्षे पुरस्कार वितरण थांबले होते, मात्र आता हा उपक्रम नियमित होईल. सन 1981 पासून सुरू असलेल्या या पुरस्काराची रक्कम आता एक लाख रुपये करण्यात आली आहे. महिला शिक्षण आणि समाजातील त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी शासन सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. तसेच सावित्रीबाई फुले यांचे साहित्य कमी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाईल.
माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाची आठवण करून दिली आणि हा पुरस्कार दरवर्षी नियमितपणे देण्यात यावा, अशी मागणी केली. शेवटी आभार कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर यांनी मानले.
राज्यभरातील महिलांचा सन्मान
जनाबाई उगले (पुणे विभाग), डॉ. प्राजक्ता कुलकर्णी (नाशिक विभाग), फुलन शिंदे (कोकण विभाग), मिनाक्षी बिराजदार (छत्रपती संभाजीनगर विभाग), वनिता अंभोरे (अमरावती विभाग) आणि शालिनी सक्सेना (नागपूर विभाग) यांचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त महिलांना एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानपत्र देण्यात आले.