मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा कौल मतदारांनी दिला आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवेसना सोडल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद थेट न्यायालयात पोहोचला. एकनाथ शिंदे यांना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाणाचे चिन्ह अधिकृतपणे मिळालं. नियमानं एकनाथ शिंदे यांना पक्ष चिन्ह आणि नाव मिळालं असलं तरी जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना कोणाची? याचा निर्णय बाकी होता. निकालानंतर याचे थेट उत्तर राज्यातील जनतेनं त्यांच्या मतांच्या दानातून दिलं आहे. शिंदे यांना या निवडणुकीत तब्बल 57 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे शिवेसना एकत्रित असताना 2019 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना 56 जागा मिळाल्या होत्या. आता पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर मात करत बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आपणच असल्याचे सिद्ध केलं आहे.