Tanaji Sawant Son Kidnapping Case: शिवसेना नेते आणि माजी राज्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील सिंहगड भागातून तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या कथित घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सिंहगडजवळील नर्हे परिसरातून सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास तानाजी सावंत यांच्या मुलाचे स्विफ्ट कारमधून अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षालाही या घटनेबाबत एक निनावी फोन आला. अपहरण करण्याता आलेल्या तानाजी सावंत यांच्या मुलाचे नाव ऋषिकेश सावंत असून तो पुण्यात राहत होता.
हेही वाचा - नांदेडमध्ये भरदिवसा गोळीबार; गुरुद्वाराबाहेर दुचाकीस्वार हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 3 जण जखमी, एकाचा मृत्यू
प्राप्त माहितीनुसार, सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. स्विफ्ट कारमधून चार जणांनी उतरून त्याचे अपहरण केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण कोणी आणि कोणत्या उद्देशाने केले याचा तपास पोलिस करत आहेत. पुण्यातील कात्रज परिसरातील तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी पोलिसांचे पथक पोहोचले आहे.
दरम्यान, तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी कोणी फोन केला होता का? किंवा खंडणी मागितली गेली होती का? याचाही पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणात ऋषिकेश सावंत यांचे कॉल रेकॉर्ड तपासले जात आहेत. अपहरणाबद्दलचा एक निनावी कॉल पुण्यातील नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
हेही वाचा - संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांशी अरेरावी करणाऱ्याला पुन्हा अटक
तानाजी सावंत यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून काम पाहिले होते. तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी पुण्यातील भारती विद्यापीठ विद्यापीठात स्थापत्य अभियांत्रिकीचे प्राध्यापक म्हणून काम केले होते. शैक्षणिक कारकिर्दीत त्यांनी वयाच्या 30 व्या वर्षी बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवले. 1998 मध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये जेएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली आणि नंतर महाराष्ट्रात आणखी सहा महाविद्यालये स्थापन करून त्यांचा विस्तार केला.