मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि महायुतीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. "या देशात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन कायदा आहे, सेव टायगर योजना आहे. टायगर म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आहे. आता काहींना वाइल्ड कॅट्स म्हटलं जात आहे. जे जात आहेत त्यांना शुभेच्छा, पण राजकारणात शक्ती आणि पैशाच्या जोरावर कार्यकर्त्यांना तोडण्याचे प्रकार सुरू आहेत," असे राऊत यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत
संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नुकत्याच केलेल्या भाषणावर सकारात्मक प्रतिसाद दिला. "राज ठाकरेंच्या भूमिकेचे स्वागत करायला काही हरकत नाही. कोणी योग्य भूमिका घेत असेल तर त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहायला हवे. महाराष्ट्रात ईव्हीएम संदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत आणि भाजपसोबत सौहार्द असलेल्या नेत्यांनीही यावर प्रश्न विचारले पाहिजेत. राजू पाटील यांना त्यांच्या गावात एकही मत मिळाले नाही, ही बाब संशयास्पद आहे. अशा अनेक जागांवर असे प्रकार घडले. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या जादूचा उलगडा करावा," असे राऊत यांनी म्हटले.
'जातीय राजकारणामुळे महाराष्ट्राचे नुकसान'
राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. "या देशात आणि राज्यात जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जातीचा आधार असलेल्या नेत्यांवर कायदा नरम आहे. महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण वाढत आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्र फोडण्याचे काम केले आहे, आणि भाजपला त्याचा फायदा होत आहे," असे राऊत म्हणाले. "अमित शाह यांनी महाराष्ट्र सरकार आणले, ईव्हीएम सेट केले आणि गोंधळ निर्माण केला. आता फडणवीस आणि अजित पवार एकमेकांवर जबाबदारी टाकत आहेत, पण महाराष्ट्रातील जनतेने त्यांना ओळखले आहे," असेही ते म्हणाले.
'शिवसेना तोडायचा डाव सुरू'
संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशावरही भाष्य केले. "शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होती, आहे आणि राहील. बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाताना वाईट वाटते. जाणाऱ्यांनी विचार केला पाहिजे की गेल्या ३०-३५ वर्षांत या पक्षाने त्यांना काय दिले. ठाकरे ब्रँड संपवण्यासाठी दिल्लीतील सत्ताधारी काम करत आहेत, पण महाराष्ट्र प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने याविरोधात उभे राहिले पाहिजे," असेही त्यांनी स्पष्ट केले.फडणवीस यांच्या एका कार्यक्रमातील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "लग्न, मुंजी, वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये अनौपचारिक चर्चा होतात. लोक भेटतात, भावना व्यक्त करतात. फडणवीस यांना काही मनात असेल तर त्यांनी ते लक्षात घ्यावे. रायगडचे पालकमंत्रीपद सध्या अजित पवार गटाकडे आहे, त्यांचा अंतर्गत विषय काय आहे हे माहित नाही.
"'खोटे बोलण्याचा नोबेल मोदींना द्यावा'
राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवरही निशाणा साधला. "खोटे बोलण्याच्या बाबतीत कोणाला नोबेल द्यायचे असेल तर तो मोदींना मिळाला पाहिजे. खोटे बोलून पक्ष फोडण्याची परंपरा भाजपने आणली आहे. अमित शाह यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले, पण त्याचा त्यांनी विसर पडला. भाजपने महाराष्ट्रात कर्जमुक्तीचा नारा दिला, पण अजित पवार यांनी तो खोटा ठरवला," अशी टीका त्यांनी केली.संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेत भाजप, फडणवीस, अजित पवार आणि ईव्हीएम संदर्भात अनेक गंभीर आरोप करण्यात आले. "महाराष्ट्र संकटात आहे, पण आम्ही महाराष्ट्रासाठी लढत राहू," असे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
#SanjayRaut #MaharashtraPolitics #Shivsena #BJP #EVMScam #UddhavThackeray #RajThackeray #DevendraFadnavis #AjitPawar #PoliticalNews