Wednesday, September 18, 2024 02:23:14 AM

Rain Update
गोंदियाला पावसाचा तडाखा

गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

गोंदियाला पावसाचा तडाखा

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे गोंदियात नदी - नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. नाल्यालगत असलेले एक घर वाहून गेले. दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. वाहून गेलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. 

गोंदिया शहरातील रिंग रोड आणि कुडवा परिसरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सार्वजनिक मंडळाच्या गणपतीसमोर पाणी साचले आहे. लोहारा जवळील बाग नदीपात्रामध्ये एक डिझेलचा टँकर रस्त्यावरून जात असताना पाण्यात वाहून गेला. पुलावरुन पाणी वाहू लागले असताना टँकर चालकाने पुलावर टँकर नेण्याचा निर्णय घेतला. हा चुकीचा निर्णय त्याला भोवला.

गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाची तेरा गेट ३.६० मीटर एवढी उघडली आहेत. धरणातून ९२ हजार ५४८ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे सात गेट ३.३० मीटर एवढी उघडली आहेत. धरणातून ५२ हजार ७३८ घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाघ नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. नदीकिनारी असलेल्या गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. 

चंद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस

चंद्रपुरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे विदर्भात जोरदार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.

भंडाऱ्यात मुसळधार पाऊस

भंडारा जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाचे ३३ पैकी २५ दरवाजे ०.५ मिटरनं उघडण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. 


सम्बन्धित सामग्री