रायगड : जिल्ह्यातील पेण आणि सुधागड तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास पेण तालुक्यातील तिलोरे आणि वरवणे तसेच सुधागड तालुक्यातील महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी आणि कवेळी वाडी भागात जमिनीला सौम्य हादरे बसल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर महसूल प्रशासनाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार कुंभार यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसह गावांना भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. महसूल विभागाच्या पथकानेही वरवणे गावाला भेट दिली.
ग्रामस्थांच्या मते, जमिनीला हादरे बसल्यानंतर काही क्षण भु-गर्भातून आवाज आल्याचे ऐकू आले. त्याचवेळी घरातील भांडी हलल्याचीही अनुभूती काही लोकांनी घेतली. मात्र, सुदैवाने कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाला कळवले. तरीही या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची गंभीर दखल घेत महसूल प्रशासनाने हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्राशी संपर्क साधला. मात्र, अधिकृत संकेतस्थळावर याची कोणतीही नोंद झालेली नाही, अशी माहिती मिळाली. त्यामुळे या घटनेच्या कारणांचा अधिक तपशीलवार अभ्यास करण्यासाठी जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (GSI) संस्थेला सर्वेक्षण करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच या प्रकाराबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाल्यास तत्काळ ग्रामस्थांना सूचित करण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
👉👉 हे देखील वाचा : Delhi New CM: सस्पेंस संपला! दिल्लीची कमान रेखा गुप्ता यांच्या हातात; दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ