धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 जी च्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या रस्त्याविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन उभारले आहे. रस्त्याच्या रखडलेल्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे स्थानिकांच्या संतापाला ऊत आला आहे.
संदीप देवरे यांनी या समस्येचा निषेध म्हणून उपोषण सुरू केले. मात्र, त्यांच्या उपोषणाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही, यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली आणि शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या.
गेल्या अनेक महिन्यांपासून पिंपळनेर परिसरातील महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघातांचे प्रमाणही वाढले असून, यामुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता आहे.ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, महामार्गाच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू व्हावे. त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला इशारा दिला की, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.