रायगड: डिसेंबर महिना आला की नववर्षाच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरु होते. वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा हा काळ प्रत्येकासाठी खास असतो. कोणी नाताळ साजरा करण्यासाठी प्रवास करतो, तर कोणी घरीच कुटुंबीयांसोबत किंवा मित्रमंडळींसोबत पार्टी करतो. या सणाच्या उत्साहाला रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावामध्ये एक आगळीवेगळी पारंपरिक रंगत असते.
कोर्लाई गावाची खासियत म्हणजे येथील पोर्तुगीज परंपरा. पोर्तुगीज देश सोडून गेलेल्या काही लोकांनी कोर्लाई गावात आपला निवास केला आणि त्यांचे वंशज आजही त्या परंपरेला जपत नाताळ साजरा करतात. कोर्लाईतील ख्रिश्चन वसाहत हा या परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. येथे प्रत्येक घरी येशू ख्रिस्तांच्या जन्माचा देखावा उत्साहाने साकारला जातो.
नाताळसाठी गावभर मोठी तयारी होते. केक, करंजी, डोनट, शंकरपाळी अशा गोड पदार्थांची चव या सणाला अधिक गोड करते. घराघरात लायटिंग, सजावट, आणि देखाव्यांमुळे कोर्लाई गाव एक वेगळाच उत्साही रंग धारण करतं. ग्रामस्थांमध्ये नाताळसाठी विशेष उत्साह असतो आणि हा सण सर्वधर्मीय ग्रामस्थ एकत्र येऊन साजरा करतात.
कोर्लाई गावात नाताळ साजरा करणे ही एक सांस्कृतिक परंपरा आणि कौटुंबिक उत्सवाचा संगम आहे. गावाचा हा उत्साह आणि परंपरांचा सन्मान हे ख्रिसमसच्या खऱ्या अर्थाने आनंदाचा संदेश देतात. कोर्लाईच्या अशा आगळ्यावेगळ्या सण साजऱ्याचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटकही येथे हजेरी लावतात.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा :
https://whatsapp.com/channel/0029Va9QJRHFSAt2p8b9Cx3t