२२ जुलै, २०२४ भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण ओपारा गावाला पुराने वेढा घातला आहे. दोन हजार लोकसंख्येच्या या ओपारा गावातील जवळपास तीनशे पेक्षा जास्त घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हाहाकार माजला आहे. दरम्यान, पुरात वाहून जाणाऱ्या एका युवकास नागरिकांनी वाचविले आहे. तर, पुरामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. यामुळे गावातील संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. सध्या पूरग्रस्त नागरिकांना शासकीय गोदामात स्थलांतरित करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात प्रशासनाची कोणतीही मदत किंवा बचाव पथक गावात पोहचले नसल्याने नागरिकांतून रोष व्यक्त केला जात आहे.
या पुरामुळे गावातील मुख्य चौकात जवळपास दहा फूट पाणी असून मंदिर, ग्रामपंचायत तसेच अनेक इमारतींमध्ये पाणी शिरले आहे. मुख्य रस्त्यावरून तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. तर, तीनशे पेक्षा अधिक घरांमध्ये एक ते दोन फूट पाणी जमा झाल्याने जीवनावश्यक साहित्याची नासधूस झाली आहे. अद्यापही गावात बचाव पथक पोहचले नसल्याने गावकऱ्यांना स्वतः पुढाकार घेऊन पूरग्रस्तांना मदत करावी लागत आहे. 'जिल्हा प्रशासनाने तात्काळ मदत करावी', अशी मागणी पूरग्रस्त नागरिकांनी केली आहे.