Wednesday, March 26, 2025 11:27:24 AM

Nagpur Violence Devendra Fadanvis: फडणवीसांनी सांगितला नागपूर हिंसाचाराचा थरारक घटनाक्रम

मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी नागपूरच्या महाल आणि हंसापुरी भागात घडलेल्या हिंसाचारावर आपली भूमिका मांडली.

nagpur violence devendra fadanvis फडणवीसांनी सांगितला नागपूर हिंसाचाराचा थरारक घटनाक्रम

नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. 'राज्यात कोणीही दंगा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर जात-धर्म न पाहता कारवाई केली जाईल. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही,'असा ठाम इशारा त्यांनी दिला.

मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी नागपूरच्या महाल आणि हंसापुरी भागात घडलेल्या हिंसाचारावर आपली भूमिका मांडली. नागपूरमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सर्व धर्मीय नागरिकांना संयम राखण्याचे आणि शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले.

हिंसाचाराचा थरारक घटनाक्रम
सोमवारी नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने ‘औरंगजेबाची कबर हटवा’ अशी मागणी करत आंदोलन केले. या आंदोलनात त्यांनी गवताच्या पेंड्यांपासून बनवलेली प्रतिकात्मक कबर जाळली. या घटनेनंतर गणेश पेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आणि परिस्थिती शांत होती.मात्र, संध्याकाळी वातावरण अचानक बिघडले. अफवा पसरली की, जाळलेल्या कबरवर धार्मिक मजकूर होता. नमाज आटोपून परतणाऱ्या 200 ते 250 लोकांच्या जमावाने आक्रमक भूमिका घेत नारेबाजी सुरू केली. 'आम्ही आग लावून टाकू,'असे उघडपणे धमक्या दिल्या गेल्या. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर केला, अशी माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.

मुस्लीम समाजातील काही लोकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार देण्याची मागणी केली. तेव्हा त्यांची तक्रार ऐकण्यासाठी त्यांना गणेश पेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. याचवेळी हंसापुरी भागात 200 ते 300 लोकांच्या जमावाने हातात काठ्या घेऊन पोलिसांवर आणि नागरिकांवर दगडफेक केली. हल्लेखोरांनी चेहऱ्यावर फडकी गुंडाळली होती.या हिंसक जमावाने 12 दुचाकींची तोडफोड केली आणि काही लोकांवर घातक हत्यारांनी हल्ला केला. हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध होता, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: 'पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही' फडणवीसांचा थेट इशारा

सायंकाळी साडेसातच्या सुमारास भालदारपुरा भागात 80 ते 100 लोकांच्या जमावाने पोलिसांवर थेट हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुर आणि सौम्य बळाचा वापर केला. परंतु, जमावाने एक क्रेन आणि काही चारचाकी वाहने पेटवून दिली.या हिंसाचारात एकूण 33 पोलीस जखमी झाले. त्यामध्ये तीन उपायुक्त (DCP) दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विशेषतः एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. याशिवाय पाच नागरिक जखमी झाले असून त्यापैकी एक व्यक्ती अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

'पोलिसांवर हल्ला करणार्यांना कोणत्याही परिस्थिती सोडणार नाही' देवेंद्र फडणवीस
सकाळच्या घटनेनंतर त्यानंतर मध्यंतरी शांतता होती. त्यानंतर संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केला. कारण पोलिसांना एक ट्रॉली भरुन दगड मिळाले. वरती दगड जमा करुन ठेवण्यात आले होते. शस्त्रास्त्र मोठ्याप्रमाणावर होती. एका डीसीपी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यामध्ये काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न होता. या लोकांवर कारवाई केली जाईल. कोणालाही कायदा-सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला आहे अशा लोकांना काही झाले तरी सोडले जाणार नाही.  पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही. पोलीस शांतता प्रस्थापित करत होते. अशावेळी त्यांच्यावर केलेला हल्ला चुकीचा होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचा: नागपुरात हिंसाचारानंतर तणावपूर्ण शांतता, 80 जणांना अटक, 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू


सम्बन्धित सामग्री